शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११

सिमेंटचे बी

(जलरंग रेखाटन: सुरेश पेठे)

सुरेश काका म्हणतात, सिंहगड रोड वरील अभिरूची - भिडे बाग ही जागा एकेकाळी मन उल्हासित करणारी, रुचकर खास जेवण , त्यानंतर विशाल आमराईत थोडी विश्रांती, मनसोक्त खेळ --झॊपाळे ...चैन होती ! आता तिथे ही सिमेंटचे ’ बी ’ पडले आणि बघता बघता सिमेंटचे जंगल तय्यार झाले ! त्यांच्या 'सिमेंटचे बी पडले' या शब्दांचे बीज घेऊन ही रचना सादर करतोय.
.
.
प्रगतीच्या नावावर हिरवाईला खुडले
आता आमराईमधे सिमेंटचे बी पडले

विवेकाला दूर केले विकासाची नशा झाली
वर शोभेसाठी आता विकतची झाडे आली
सिमेंटच्या जंगलात शुद्ध श्वासही हुकले
आता आमराईमधे सिमेंटचे बी पडले

रागवते वसुंधरा कोणी ऐकायास नाही
गाडी महत्वाकांक्षेची धरायाला अहोघाई
शितछाया पाणी नाही निसर्ग गाडे चिडले
आता आमराईमधे सिमेंटचे बी पडले

आठवावे किती तरी चैतन्याच्या खाणी होत्या
शहराच्या मधे बागा आरोग्याच्या लेणी होत्या
आरोग्याचे वर पारडे हट्टाचे खाली झुकले
आता आमराईमधे सिमेंटचे बी पडले

तुषार जोशी, नागपूर
०४ नोव्हेंबर २०११, १०:००
.
.